ओसाड भूप्रदेशी अंकूर एक फुटला
येथे कसे जगावे? तो काळजीत दिसला
जे जे समोर येते सोसायचे खुशीने
दिसला जगी कुणी का? मर्जीनुसार जगला
नवख्या पिढीतल्यांनो स्वप्ने बघा हवी ती
सल्ला उगीच देणे वृध्दास छंद जडला
कोर्टात न्याय मिळण्या इतका उशीर झाला !
मरणोपरांत माझा भांड्यात जीव पडला
इतकी कपार ओली! ह्रदयातली जिच्या, ती
आई असेल बहुधा अंदाज सत्य ठरला
मंडीत मुखवट्यांचा भारी उठाव आहे
ईमान कोण घेतो? बाजारभाव घटला
रडकी असून सूरत हसतेय प्रेत त्याचे
खुश तो जगावयाच्या शापामधून सुटला
मुद्यावरून गुद्दे हे राजरोस झाले
फुटतात टोल नाके, दाखल उगाच खटला
"निशिकांत" साकडे तू घालू नकोस देवा
पुरवून मागण्या तो नक्की असेल विटला
निशिकांत देशपांडे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY