Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

आयुष्याला दळतो आहे

 

 

दु:ख लपवुनी खोल अंतरी हसतो आहे
अजून माझ्या आयुष्याला दळतो आहे

 

समर्पणाने देव पावतो असे ऐकले
निसंग होवुन विठ्ठलास आळवतो आहे

 

दुर्दम्याची आस मनाला अशी लगली !
मृगजळ पुढती मागे मागे पळतो आहे

 

शास्त्र, पुराणे, वेद कोळुनी प्याल्यावरती
अता कुठे मी मला जरासा कळतो आहे

 

आव आणला काळिज आहे निगरगट्ट पण
निरोप घेउन जाता, मागे वळतो आहे

 

दु:ख विसरण्या, जरी वसवले नवीन घरटे
आठवणींनी घाव जुना भळभळतो आहे

 

नकोय मुक्ती, पुनर्जन्म दे हीच विनंती
पुन्हा मिळावे मातृप्रेम, कळवळतो आहे

 

फुले कागदी, सुगंध नकली तरी कसा हा
भ्रमिष्ट होवुन भ्रमर भोवती फिरतो आहे?

 

"निशिकांता"ला नका दाखवू भय मृत्त्यूचे
जगता जगता चितेविना मी जळतो आहे

 

 

निशिकांत देशपांडे.

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ