Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

अवघड असते

 

 

दार मनाचे बंद ठेवणे अवघड असते
कुणी आपुले नसता जगणे अवघड असते

 

रोज मुखवटे वेगवेगळे लावुन जगता
आरशासही सत्त्य उमगणे अवघड असते

 

लाख करू दे कैद पापण्यामधे तरीही
निरोप घेता ना ओघळणे अवघड असते

 

हवे नको ते आत्मचरित्री ठरवुन लिहिता
वास्तवदर्शी चित्र रंगणे अवघड असते

 

सॉक्रेटिसचे निर्मणुष्य बेटावर जगणे
वाचायाला मस्त, भोगणे अवघड असते

 

शब्द बेगडी भुरळ पाडती जिवास इतकी!
काय चालले मनात कळणे अवघड असते

 

डेरेदाखल जरी जाहल्या पुन्हा वेदना
हसत जगावे, सदैव रडणे अवघड असते

 

निवडणुकांचे घमासान चालू असताना
कोण मित्र, शत्रू ओळखणे अवघड असते

 

बोट मधाचे, जाहिरनामे भुरळ घालती
पिऊन मृगजळ तहान शमणे अवघड असते

 

गेल्यावरती सखी कळाले "निशिकांता"ला
मनास हळ्व्या किती रिझवणे अवघड असते

 

 

 

निशिकांत देशपांडे.

 

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ