मुखवट्यांना निश्चये तोडायचे आहे मला
थांब ना! कांही तरी बोलायचे आहे मला
अल्पआयुष्यी तरी, कांही क्षणांसाठी सही
ब्रह्मकमळासारखे उमलायचे आहे मला
साचलेल्या परिमळाची काय ती उपयोगिता?
गंध पसरायास वारा व्हायचे आहे मला
स्वर्ग नरकाची कुणाला काळजी आहे इथे?
जे मना पटते तसे वागायचे आहे मला
मेणबत्त्या लावल्याने न्याय का मिळतो कधी?
रान उठवायास आक्रोशायचे आहे मला
धावलो मागे सुखाच्या, वश कधी ना जाहले
वेदनांच्यासंगती नांदायचे आहे मला
स्वप्नपूर्तीचीच स्वप्ने दावली ज्यांनी जना
धींड त्यांची काढुनी, फिरवायचे आहे मला
भाकरीची भूक एका, भागली नाही तरी
राष्ट्रगौरव गीत, जन हो! गायचे आहे मला
वागणे "निशिकांत"चे का बेरके अंतःक्षणी?
कैक जन्मी यायचे अन् जायचे आहे मला
निशिकांत देशपांडे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY