संशयाची वाढली दलदल अता
चालला आहे कशाचा खल अता?
नांदतो निश्चिंत मी परक्यांसवे
आपुल्यांचा काळजाला सल अता
दल बदलणे राज्यकर्त्यांची खुबी
कोणत्या बाजूस त्यांचा कल अता?
भूत काळाला पुरोनी टाकले
आठवांचे कोरडे बादल अता
पाहिले पाषाणह्रदयी एवढे!
कोण आहे या जगी कोमल अता?
बावरी राधा कुठे ना भेटते
शामही ना राहिला शामल अता
राजधानी तीच, दरबारातुनी
लोपले नवरत्न अन् बिरबल अता
शासना टिमकी नको तू वाजवू
वंचनांचा ऐक कोलाहल अता
लेखणी "निशिकांत" झाली शांत का?
चित्तवृत्ती जाहली चंचल अता
निशिकांत देशपांडे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY