लावलेली खंजिराला धार आहे
आपुल्यापासून धोका फार आहे
ऊब मायेची कुठेही सापडेना
चालला चोहीकडे व्यापार आहे
भाजणे पोळ्या चितेवर आपुल्यांच्या
हेच आता संस्कृतीचे सार आहे
अल्पसंतुषटी अशी की पोट भरता!
स्वप्न झाले वाटते साकार आहे
सासरा, काका असो वा दीर घरचा
ग्रस्त भीतीने बिचारी नार आहे
बुध्दिवाद्यांनो चिडा अन्याय बघुनी
लेखणी हातातली तलवार आहे
कोडगा झालो, न कण्हतो वेदनांनी
संकटांचा जीवनी भडिमार आहे
थाट प्रेताचा किती तो अंतयात्री !
व्यर्थ जगलो ही खरी तक्रार आहे
ठेविले जैसे अनंते सांजवेळी
राहण्याचा अंतरी निर्धार आहे
वाटले "निशिकांत"ला नेता बनावे
घाण दिसता घेतली माघार आहे
निशिकांत देशपांडे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY