गर्दीत माणसांच्या एकांतवास आहे
परके सभोवताली, इतकाच त्रास आहे
निर्माल्य फेकलेले रमतेय भूतकाळी
इतिहास एवढासा! जेथे सुवास आहे
औलाद आज म्हणते "ते पाळतात आम्हा"
तारुण्य बादशाही वृध्दत्व दास आहे
येता घरी कवडसा, कसला प्रकाश उत्सव?
अंधार भेडसावी जो आसपास आहे
देवास शोधण्याला फिरलो, न भेटला तो
बघता मनात, कळले माझ्यात वास आहे
आयुष्य मखमलीचे जगण्यात मौज कसली?
काट्यात नांदण्याचे कौशल्य खास आहे
चर्चा सुरू नव्याने गरिबार्थ योजनांच्या
आल्या निवडणुका हा माझा कयास आहे
लाखो लवाद बसले सत्त्यास शोधण्याला
हा वेळ काढण्याचा खासा प्रयास आहे
अपुले उडून गेले "निशिकांत" का झुरावे?
शाश्वत तुझा तरी का? तू सांग श्वास आहे
निशिकांत देशपांडे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY