सोडलेला गाव माझा दूर आहे
लागली हळव्या मना हुरहूर आहे
टेकड्या शहरातल्या हरवून गेल्या
लॉन टिचभर वाटते भरपूर आहे
झोपडीतुन भूक जळते; गोपुरी पण
नांदतो का सोनियाचा धूर आहे?
धूप, चंदन. तेल, काजळ बंद झाले
राखण्या सौंदर्य डव, संतूर आहे
जाहिराती केवढ्या! लपवावयाला
वास्तवाचे चित्र जे भेसूर आहे
वाटते नेत्यांस, आहे शांत जनता !
अंतरी आक्रोशते काहूर आहे
"टाक मत झोळीत" म्हणती सर्व नेते
भीक ग्रहणी मागणे मंजूर आहे
लाचखोरी अश्वमेधाला निघाली
अश्व त्यांचा दौडतो चौखूर आहे
गीत गा "निशिकांत" अंती ईश्वराचे
लागलेला आर्त हळवा सूर आहे
निशिकांत देशपांडे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY