जीवनाच्या आर्ततेला शोभली माझी ग़ज़ल
वेदनांच्या सप्तरंगी रंगली माझी ग़ज़ल
सारुनी पडदा धुक्याचा शोधली माझी ग़ज़ल
चोरली होती जिने ती जाहली माझी ग़ज़ल
फाटका संसार माझा मी असा नि:संग पण
शांत माझ्या सोबतीने नांदली माझी ग़ज़ल
मी कधी बोलू न शकलो, गप्प तूही लाजरी
भाव माझे व्यक्त करण्या बोलली माझी ग़ज़ल
वाचते ग़ज़ला कुणी का पुस्तकातिल सांग ना !
गाइली तू त्या क्षणाला गाजली माझी ग़ज़ल
टांगता मी कैक लफडी.चावडीवर गावच्या
राज्यकर्त्यांच्या मनाला झोंबली माझी ग़ज़ल
पाहता वृध्दाश्रमी मातापित्यांना पोरके
ओघळाया लागली आक्रंदली माझी ग़ज़ल
ना कधी टाळ्या मिळाल्या, ना कधी "क्या बात है"
पण तरी परिघात अपुल्या वागली माझी ग़ज़ल
सांगता मी चार गोष्टी चांगल्या ग़ज़लेतुनी
थिल्लारांना का हज़ल ही वाटली माझी ग़ज़ल
श्वास शेवटच्या क्षणी ज्या घेतला "निशिकांत"ने
त्या क्षणाला मूक झाली संपली माझी ग़ज़ल
निशिकांत देशपांडे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY