Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

काळवंडली सकाळ आहे

 

तू गेल्याने क्षितिजावरती काळवंडली सकाळ आहे
आल्यावर तू अंधाराचा रंग भासतो दुधाळ आहे

 

कशास वाचू आत्मवृत्त जे एरंडाचे गुर्‍हाळ आहे?
चार सुखाचे क्षण टिपलेले पान नेमके गहाळ आहे

 

जरी शिवाशिव आणि सोवळे पाळत नाही कुणी तरी पण
इमानदारी अन् शुचितेचा कैक जणांना विटाळ आहे

 

परंपरेच्या पिंजर्‍यातली कैद शेवटी रुळून जाते
काय फायदा? ठाउक नसुनी आर्घ्य वाहतो त्रिकाळ आहे

 

पाय घसरता कधी मुलीचा ठार मारती पालक तिजला
हेच मुलाने करता त्यांचे धोरण दिसते मवाळ आहे

 

"जगा यंत्रवत पैशांसाठी" शाप लाभला नव्या पिढीला
गायन, वाचन, छंद हरवले, जीवन झाले रटाळ आहे

 

माय न देते वेळ मुलाला, तिचे करीअर प्रश्न केवढा?
दाया अन् पाळणाघरांचा गल्लोगल्ली सुकाळ आहे

 

कुठे हरवले बेसन लाडू, शंकरपाळी आणि करंज्या?
"कुछ मीठा हो कॅडबरी का" तयार आता फराळ आहे

 

"निशिकांता"ला देव कृपेचा प्रसाद मिळता किमया झाली
माध्यान्हीच्या उन्हात त्याच्या वाटेवरती शिराळ(*) आहे

 

 

(*) कडक उन्हात चालताना आपणास बर्‍य्यच वेळेस दिसते की कांही भागात ऊन्हात सावलीची छटा मिसळून फिके ऊन असते तर अगदी थोड्या अंतरावर कडक ऊन पण दिसते. सावलीची छटा असलेले ऊन पडण्याच्या प्रकाराला मराठवाड्यात शिराळ पडले असे म्हणतात.

 

 

 

निशिकांत देशपांडे.

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ