नगदीत "ना" तुझी अन् "हो" का उधार आहे?
हा प्रेम दावण्याचा कुठला प्रकार आहे?
तू नेहमी शिकारी अन् मी शिकार आहे
घायाळ होत जगणे जडला विकार आहे
बाहूत एवढा मी असतोय धुंद तुझिया
मृत्त्यू खुणावतो पण देतो नकार आहे
रागावणे, अबोला मी झेलतो खुशीने
नक्की तुझ्या मनीही ओली कपार आहे
चुचकारले सुखाला वश ते कधी न झाले
दु:खास हासण्याची विणतो किनार आहे
का कर्मकांड करुनी फाल प्राप्त होत असते?
सूर्यास अर्घ्य पण मी देतो त्रिवार आहे
बुजवावयास भेगा, कसला करू गिलावा?
दोघात फार मोठी पडली दरार आहे
कळपात श्वापदांच्या जगलो निवांत होतो
शेजार माणसांचा मोठा जुगार आहे
भक्तास शोधताना याचक विठूस दिसले
स्वार्थात अंध जो तो जगतो भिकार आहे
"निशिकांत" ओळखावे पंखातल्या बळाला
भाग्यावरी तुझी का इतकी मदार आहे?
निशिकांत देशपांडे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY