उत्तररात्री सूर लागला मैफिल सरता सरता
झंकाराविन जीवन जगलो तारा जुळता जुळता
तृप्त होतसे भल्या पहाटे ओव्या कानी पडता
माय गायची गाणे जेंव्हा ज्वारी दळता दळता
जरी न पुसती मुले पोटची, जीव असा तुटतो की,
चितेवरीही पाश ओढती मागे जळता जळता
प्रेम तोलणे पैशासंगे न्यायसुसंगत नसते
तरी सांगता प्रेमाची का हिशोब करता करता?
चंगळवादी जीवनशैली घरात रुजली इतकी !
गप्पा मारत? छे!छे! जेवण, टीव्ही बघता बघता
अता जिजाऊ सांगत नाही शूरविरांच्या गोष्टी
शिवबा ऐकत असतो फिल्मी गाणी निजता निजता
तेवत असता समर्पणाने, दुर्लक्षित ती होती
अंधाराची धडकी भरते, समई विझता विझता
जोहाराची प्रथा कशाला?कधी समजले नाही
वीरमरण का स्त्रीस नसावे, रणात लढता लढता?
"निशिकांता"ला काच सखीचा विरही गुदमरणारा
बधीर होउन क्षण शेवटचे जगेन मरता मरता
निशिकांत देशपांडे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY