नकोस माझी करू काळजी जिथे जसा मी खुशाल आहे
तुझ्याविनाही जिवंत कैसा? मलाच माझा सवाल आहे
जाता जाता भेट दिली का भळभळणार्या जखमांची तू
रोज सोसतो तिव्र वेदना, उपाय त्याहुन जहाल आहे
वाट दाखऊ कशी कुणाला? मीच असा हा भरकटलेला
काय फायदा? हाती माझ्या अंधाराची मशाल आहे
पिऊन प्याल्यावरती प्याले रात्र रात्र मी जागत असतो
दिवाळखोरी घरात आली, अमीर झाला कलाल आहे
पैसे देउन तुझी ईश्वरा यथासांग मी पुजा बांधली
भटजीचे वागणे असे की जणू तझा तो दलाल आहे
जरी एकटा भणंग आहे, करू नको काळजी जराही
आई! तुझिया आठवणींची पांघरली मी दुशाल आहे
आज इथे तर तिथे उद्याला, स्थैर्य काय ते मला न ठावे
सैलानी मी मस्त कलंदर विश्व केवढे विशाल आहे !
योग्य वाटले तसेच जगलो, पाप पुण्य हा विचार नव्हता
स्वर्ग मिळो की नर्क शेवटी कुणी पाहिला निकाल आहे
"निशिकांता" रे खूप अपेक्षा प्रेमामध्ये कधी नसाव्या
ती असताना झोपडीतही अनुभवला मी महाल आहे
निशिकांत देशपांडे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY