Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

नको तेच आठवते

 

स्मृतिपटलावर वार्धक्याच्या वेदनाच वावरते
सर्व चांगले विसरुन जाते, नको तेच आठवते

 

लिहून नुसते भाकरीवरी पोट कधी का भरते?
विद्रोही कविता का लिलया जळत्या भुकेत फुलते?

 

श्रीमंतांच्या श्वानांनाही खाद्य चांगले मिळते
मुले कुपोषित गरिबांची का? शल्य मनाला छळते

 

नको पसारा वृत्त, काफिया, लगावली, मात्रांचा
नवकवितेची आशयघनता छंद नसोनी भिडते

 

काळी लैला का आवडली? मजनूला ते ठावे
तर्क लढवुनी आपण म्हणतो "प्रेम आंधळे असते"

 

गातो कोकिळ तरी कोकिळा भाव खाउनी जाते
"गान कोकिळा" शब्द कसा मग? विचारायचे नसते

 

घरात एका अनेक भिंती नात्यानात्यांमधल्या
तिर्‍हाइतासम सर्व नांदती, कोण कुणाला पुसते?

 

दिली मनीची कपार ओली सखीस माझ्या ह्रदयी
तिथे न बसता बनून श्रावण गझलेतुन रिमझिमते

 

ताक फुंकुनी पी "निशिकांता" जगात वावरताना
सभ्य मुखवट्याआड श्वापदे लपल्याचे जाणवते

 

 

निशिकांत देशपांडे

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ