पायरी चढलो जशी वृध्दाश्रमाची
खंत सरली आपुले घर सोडल्याची
वाटला दरवळ जगाला शक्य तेंव्हा
का व्यथा निर्मल्य आता जाहल्याची
जाहलो इतका नकोसा, त्या मुलांना
बातमी देवू नका मी वारल्याची
"ठेविले जैसे अनंते" तत्व ज्यांचे
वेदना छळते न बाजी हारल्याची
सूर्य नाही झेलला ज्याने कधीही
का अपेक्षा बाळगावी सावल्यांची?
ओठ शिवल्याने कधी का दु:ख लपते?
चेहर्यावर मांदियाळी भावनांची
भेद सुखदु:खात करणे टाळण्याने
वेदनाही मेजवानी या जिवाची
सुरकुत्यांचे राज्य आले पण तरीही
शायरी झरते मनातुन श्रावणाची
धबधबा "निशिकांत" होउन घे उडी तू
अल्पसंतुष्टी नको डबक्यातल्याची
निशिकांत देशपांडे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY