शब्द विद्रोही अताशा वापराया लागलो
वादळाचे गीत ओठी गुणगुणाया लागलो
मूठ माझी बंद होती लाखमोलाची तरी
चावडीवर लक्तरांना वाळवाया लागलो
आव असतो ध्येय मोठे गाठण्याचा नेहमी
शोधण्या उंदीर डोंगर पोखराया लागलो
रोजच्या त्या मेजवान्या, पंचतारांकित सजा
मौज झुणका भाकरीची अनुभवाया लागलो
शक्य नसते पण तरीही वास्तवाला झाकतो
क्रीम लावत सुरकुत्यातुन मुक्त व्हाया लागलो
माळ कवड्यांची गळा अन् ढोंग अंबेचा उदो
जोगव्याने भूक माझी भागवाया लागलो
अंधश्रध्दा, पिंपळावर भूत असते अंगणी
जाग येता रामरक्षा पुटपुटाया लागलो
ठेपला येऊन मृत्त्यू पण सुटेना मोह का?
जे न येते साथ तेही आवराया लागलो
अंत का "निशिकांत" व्हावा जीवनाचा हा असा?
राहिल्या इच्छा अधूर्या घुटमळाया लागलो
निशिकांत देशपांडे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY