तुझ्या भोवती सदैव दरवळ
भ्रमराला का म्हणशी "जा पळ !"
तुझ्या चाहुलीनेही कातळ
रोमांचित, पांघरतो हिरवळ
राम असा का? उठले वादळ
आश्रमातली सरली वर्दळ
नेत्यांनी मांडलाय गोंधळ
अंबे अमुच्या हाती संबळ
सोफ्यावरती बसून चर्चा
केल्याने का होते चळवळ ?
नवीन बाराखडी शीक तू
वाचाया नेत्रीचे ओघळ
खाकीशी दोस्ती गुंडांची
सभ्य कापती भिऊन चळचळ
वठून जाता कुठे हरवली?
वृक्षाच्या पानांची सळसळ
गंगा म्हणते कुठून आणू ?
पाप धुवाया पाणी निर्मळ
एल्गाराची करा तयारी
वांझोट्या गप्पा का निष्फळ ?
"निशिकांता"ची टिचभर खळगी
भरताना उडते तारांबळ
निशिकांत देशपांडे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY