सर्व गेले, वंचनांचे झुंड उरले शेवटी
मृगजळावर भाळल्याचे शल्य रुतले शेवटी
आठवांची आठवणही सोडुनी गेली मला
एकटेपण जीवनाचे सूत्र झाले शेवटी
माय का आव्हेरलेली आठवे अंतःक्षणी?
जन्म पुढचा तीच देइल, सत्त्य पटले शेवटी
कावळ्याने पिंड शिवलेला जरी असला तरी
घुटमळे आत्मा मुलातच, पाश कसले शेवटी
जज असो न्यायालयीचा, फाटका बाबा असो
स्त्रीत मादीचे, नरांना चित्र दिसले शेवटी
भाव आकाशास भिडले हे खरे असले तरी
मुल्य घटले माणसांचे हेच कळले शेवटी
तोंडओळखही नसावी नीतिमत्तेची असे
गुंड का सिंहासनावर मस्त बसले शेवटी?
चांदण्यातिल शिल्प ज्यांनी बांधले यमुनातिरी
त्या कलाकारांस शिक्षा, हात तुटले शेवटी
बेरक्या "निशिकांत"चे का नेत्र झरले शेवटी?
पाहता साक्षात मृत्त्यू, हास्य विरले शेवटी
आवांतरः---
"हास्य उरले शेवटी" हा शेर हुस्ने मतला (मतल्याच्या तोंडवळ्याचा) आहे. असा शेर मतल्याच्या खाली लिहावा असा संकेत आहे. पण या शेरात शायराचे नाव आल्यामुळे हा मक्ता पण आहे. मग हा शेर नक्की कुठे लिहावा? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
निशिकात देशपांडे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY