वावडे का या जगाला वास्तवाचे?
माजले का स्तोम इतके नाटकाचे?
घ्यावया शहरातले चौरसफुटाचे,
फुंकले खेड्यातले घर अंगणाचे
आव जो तो आणतो चांगुलपणाचा
मुल्य आकाशास भिडले मुखवट्यांचे
मातला अंधार इतका भोवताली
तेज थोडे म्लान झाले भास्कराचे
बालपण चिमटीतुनी निसटून जाता
वेदनामय पर्व आले आठवांचे
वादळे झेलीत जगल्याने कदाचित्
भय अताशा राहिले ना काहुराचे
हास्य उत्सव साजरा करण्यास मिटले,
जीवना! संदर्भ सारे वेदनांचे
चेहरा डागाळला अपुलाच असता
का उगा तुकडे करावे आरशाचे?
वाटले "निशिकांत" जे अपुले तुला ते
सज्ज झाले वार करण्या खंजिराचे
निशिकांत देशपांडे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY