ओढ स्वप्ने पाहण्याची
वाट बघतो श्रावणाची
दूर चाहुल पैंजणाची
चलबिचल होते मनाची
तू न येणे एक नांदी
अंतरी कोलाहलाची
लाघवी पाहून हसणे
याद येते निर्झराची
आठवांनीही गवसते
रात्र प्रणयी चांदण्याची
लाट हो येण्याअधी तू
मी कहाणी वादळाची
मी तुझ्या स्वप्नात येता
भेट झाली काजळाची
मी जरी हळवा तुझ्याशी
जात माझी कातळाची
तुजमुळे "निशिकांत" लिहितो
शायरी हिंदोळण्याची
निशिकांत देशपांडे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY