१)
नको पाश ते गळ्याभोवती करकचणारे
जगेन जीवन एकाकी मी गुदमरणारे
तोडलीस तू नवीन मैत्री नऊ दिवसाची
किती पुसावे डोळे आता ओघळणारे?
२)
प्रेम जे कधी आपुल्यातले दरवळणारे
पान जाहले इतिहासाचे फडफडणारे
भूतकाळ ना जगता येतो, गुदमर सारा
आठवणींच्या जळमटात मन भळभळणारे
३)
काव्य कशाला लिहू? न कोणी गुणगुणणारे
कुठे हरवले सूर मैफिली रंगवणारे?
गजलांचाही पोत अताशा विरही असतो
कसे लपावे मनात वादळ वावरणारे?
४)
एकच होते सप्न पाहिले मोहरणारे
तू गेल्यावर फूल जाहले ते सुकणारे
वैफल्याच्या वळणावरती जसा पोंचलो
जीवन झाले शीड सागरी भरकटणारे
५)
सप्न रेशमी भाव जागले शिरशिरणारे
विरह सोसता जीवन झाले फरपटणारे
नजर शोधते व्यर्थ तिला का अजून आहे?
तूच बंद कर देवा डोळे भिरभिरणारे
निशिकांत देशपांडे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY