अजूनही धुमसतात हृदयी तुझ्या मिठीचे सखे, निखारे...
स्मृतीच उरल्यात फक्त मागे, न राहिले कालचे उबारे!
लकाकणारे कितीक तारे, तरी सुने वाटते गगन हे....
न आज तारांगणात दिसती तुझे नि माझेच फक्त तारे!
थकून गेलेत नेत्र माझे, तुझी न काहीच गंधवार्ता....
तुझ्या सुगंधाविना मला हे उदास दिसतात आज वारे!
तमाम आयुष्य भोवरे अन् उधाण लाटांत काटले मी....
अनेक वेळा दुरून मी पाहिले दगाबाज ते किनारे!
किती गुलाबी दिवस अरे, ते...किती गुलाबी तरूणपण ते..
अजून साठीतही तनूवर पहा उमटती किती शहारे!
दिवस अरे, धांदलीत जातो, परी निशा पाहते गिळाया....
पुन्हा स्मृतींच्या सुरूच जत्रा, मनामधे माजती पसारे!
कसाबसा चालतो स्वत:लाच देत खांदा अलीकडे मी....
कितीक दु:खे, कितीक काटे, तमाम माझे-तुझेच भारे!
थकून गेलेत सर्व रस्ते, मलूल झाल्यात सर्व वाटा....
अजूनही चालतात माझे अपंग हे पाय बघ, बिचारे!
न मी शिकायत कुठेच केली, लुबाडले कैकदा मला रे.....
अधर जरी टाचलेत माझे, मला कळालेत चोरणारे!
कुणीच ना ऐकल्यात हाका, कितीकदा फोडलेत टाहो....
अता न मी राहिलोच तेव्हा, हरेकजण का मला पुकारे?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY