असा मी सूर्य की, ज्याला ढगांनी ग्रासले होते!
जगाला वाटले होते, ग्रहण मज लागले होते!!
तुझ्या लावण्यबहराचा फुलोरा पाहुनी सजणे....
फुलांचे ताटवे सुद्धा मनोमन लाजले होते!
घराच्या बंद दाराने तुझ्या, हाका दिल्या होत्या....
घराबाहेर ते माझे कलेवर थांबले होते!
तुझा मज थांग केव्हाही खरोखर लागला नाही....
कितीदा मी तुझ्या डोळ्यांमधे डोकावले होते!
उभे आयुष्यही पडले थिटे मज शोधण्या उत्तर...
कटाक्षानेच तू कोडे गुलाबी घातले होते!
निसटली माणसे सारी सरकत्या सावल्यांसम ती....
कुणी वाईट तर त्यांच्यात कोणी चांगले होते!
न संततधार डोळ्यांची कधीही थांबली माझी....
दिलासे लाभले पण ते दगाबाजातले होते!
घरोबा जाहला माझा नि दु:खांचा असा काही....
सुखांनी लांबुनी मजला परस्पर टाळले होते!
अणूरेणूंमधे माझ्या जिवाचे जाहले नाते....
युगांनी वज्र मज केले, असे मज दाबले होते!
उगा झालो हिरा नाही, फुकाची ना झळाळी ही....
किती टन प्रस्तरांनी त्या उभे मज गाडले होते!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY