असे मी काय वदलो की, करावा वाद लोकांनी!
दिली गझलेवरी माझ्या उसळती दाद लोकांनी!!
मला पाहून पक्वान्ने कशी स्मरतात लोकांना?
कसा बघ, घेतला गझले, तुझा आस्वाद लोकांनी!
कुणी भिरकावले पत्थर, स्तुतींची तर कुणी सुमने....
शिव्यात्मकही दिला गझले, तुला प्रतिसाद लोकांनी!
शहाणा तोच होता एकटा त्या घोळक्यामध्ये.....
कसे त्यालाच बघ केले, पुरे बरबाद लोकांनी!
सुरांची संपली मैफल, घरी जो तो निघालाही;
परतताना घरी नेला तिचा आल्हाद लोकांनी!
असावा पोचला माझा, बरोबर शेर हृदयाशी;
जणू तो ऐकला माझा-तुझा संवाद लोकांनी!
जगाला चाखता यावी खरी चव नादब्रह्माची;
तुझ्या गझलेत ऐकावा अनाहत नाद लोकांनी!
स्मरेना कोणत्या गझला कुठे मी वाचल्या होत्या;
विसरता मी, दिली मजला करोनी याद लोकांनी!
फुटे या लेखणीलाही असा पान्हा कधी काळी!
झराया लागली झरझर....दिली मज साद लोकांनी!!
नव्हे घड एक द्राक्षांचा, दिली मी बाग गझलांची!
लगोलग घेतला माझा, मनस्वी स्वाद लोकांनी!! –
-----प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY