आठवू दे, जन्मभर मी काय केले?
श्वास घेण्यातच उभे आयुष्य गेले!
रोज तिन्हिसांजेस हेलावून जातो....
येउनी जातात गेलेलेच हेले!
मी स्वत:आजन्म विद्यार्थीच आहे!
मी गुरू नाही, कुणी माझे न चेले!!
एवढ्या लवकर कुणी जातात का रे?
त्या नदीने जीव ते ओढून नेले!
थोरपण उरतेच मागे माणसांचे....
कोण म्हणतो की, अरे ते लोक मेले!
वावरू येथे कसे तेही कळेना....
सारखे चालू बखेडे अन् झमेले!
यायचा संदर्भ ना माझा कधीही....
पाहिले मी नाव माझे खोडलेले!
तेच लिहितो आज मी गझलेत माझ्या....
चित्त, बुद्धी, तर्क यांनी पाहिलेले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY