आठवणींची एक डहाळी.......
थरथरते का रोज सकाळी?
ओळ, ओळ सोनेरी होते.......
कुठून येते अशी झळाळी?
डोळेझाक कराया शिकलो.......
करा कितीही अता टवाळी!
झळा उन्हाच्या जाळत होत्या......
अता चांदणे मजला जाळी!
किती दुर्दशा अजून बाकी?
काय असे माझिया कपाळी?
काळजातुनी शब्द उतरले........
गझलेला नित नवी नव्हाळी!
कितीक शायर चरती कुरणे.......
गझला माझ्या जणू लव्हाळी!
रक्त कुणाचे आज सांडले?
वेगळीच लाली आभाळी!
नितांत श्रद्धा मनगटावरी........
असो भले काहीही भाळी!
चाल खेळलो मी तर माझी........
अता नशीबा, तुझीच पाळी!
रंगकिरण शोषूनच सारे......
वस्तू होते अस्सल काळी!
क्षणात पडलो प्रेमामध्ये.......
खळी गोड अन् रंग गव्हाळी!
बागेची नासधूस झाली........
मला न पत्ता, मी तर माळी!
दोन चार मी खुडतो तारे.......
अलीकडे ती तारे माळी!
जन्म स्वत:चा असा जाळुनी.......
कोण दिलेली वचने पाळी?
छान फजीती झाली माझी.......
दे मित्रा मज आता टाळी!
सरले त्याचे सर्वच अश्रू.......
रक्तच आताशा तो ढाळी!
बुकस्टालवरी मी सजलेलो.......
जो तो मजला वरवर चाळी!
गुन्हा नोंदवू कुठे? कळेना.......
जो तो मजला फक्त पिटाळी!
असो कुणाचे गव्हर्मेंट पण.....
गरिबांची ती रितीच थाळी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY