Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

आठवणींची एक तारका मनात माझ्या लुकलुकणारी!

 

वृत्त: समजाती-अष्टावर्तनी-वनहरिणी-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+८=३२मात्रा
*************************************************

 


आठवणींची एक तारका मनात माझ्या लुकलुकणारी!
जागत बसली, सवेच माझ्या, मंद हवा ती झुळझुळणारी!!

 

 

 

मी अंगाई म्हणता म्हणता, व्यथा, वेदना निजल्या माझ्या.....
विषण्णता पण, एक अनामिक, मनात माझ्या चुळबुळणारी!

 

अहोरात्र चालूच राहिली....चित्रपटाची धामधूम ती.....
नायक ज्याचा मीच, नायिका छाया माझी लवलवणारी!

 

दिवसभराचा प्रवास करुनी, थकली, निजली काया माझी!
यात्रा बाहेरून आतची सुरू मनाची झरझरणारी!!

 

मन माझे ते डोलत होते, नाचत होते तालावरती......
एक गझल, ओठांवर माझ्या अवतरली ती छमछमणारी!

 

मलाच ती अन् तिलाच मी न्याहाळत होतो एकसारखे.......
कळले नाही, कधी लागली, भावसामाधी लखलखणारी!

 

एक एक भावना अवतरे, शब्दांचा स्वरसाज घेउनी......
हृदयाच्या को-या पानावर द्विपदी उतरे रिमझिमणारी!

 

मीही सगळ्या द्विपद्यांना त्या झरू दिले मनमुराद अगदी......
बघता बघता नवीन कोरी गझलच झाली गुणगुणणारी!

 

पहाट झाली, फटफटले आकाश मनाचे आता माझ्या......
खुलले डोळे, गझल मला ती उठवत होती रुणझुणणारी!

 

प्रसन्नचित्ते हसलो दोघे, हसत हसत ती निघून गेली.....
तीच गझल डायरीत माझ्या दिसली मजला चमचमणारी!

 

 

-------प्रा. सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ