आवराया लोक आले!
सावडाया लोक आले!!
भेटण्यासाठी म्हणू की,
प्रेत न्याया लोक आले?
सांत्वनांच्या या कट्यारी.....
भोसकाया लोक आले!
प्राण माझा पार गेला......
धीर द्याया लोक आले!
फोडुनी टाहो बुडालो......
हात द्याया लोक आले!
पार झालो राख तेव्हा.......
वाचवाया लोक आले!
मी जिता जीवाश्म होतो!
मज पुराया लोक आले!!
दान मागायास गेलो.......
ओळखाया लोक आले!
काल ज्यांनी ढकलले ते........
सावराया लोक आले!
ना कुठे नामोनिशाणी........
साद द्याया लोक आले!
सोयरे नव्हते शवाचे.........
पेटवाया लोक आले!
आप्तही ओळख विसरले........
ओळखाया लोक आले!
सावली माघार झाली......
साथ द्याया लोक आले!
वादळेही तेव म्हटली......
मालवाया लोक आले!
प्रेत होते भाग्यशाली!
पोचवाया लोक आले!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY