आयुष्य कैक वेळा बेतून पाहिले मी!
केव्हा शिवून, केव्हा उसवून पाहिले मी!!
तुकडे तुझ्या स्मृतींचे जोडून पाहिले मी....
संदर्भ जीवनाचे जुळवून पाहिले मी!
कोणात काय अंतर ठेवायचे समजले!
दुनियेस खूप वेळा जवळून पाहिले मी!!
टीका, टवाळखोरी....धुळवड हरेक दिवशी!
चिखलातही खुबीने उमलून पाहिले मी!!
बघता क्षणीच आले मज ओळखावयला....
पेल्यात वीष होते.....रिचवून पाहिले मी!
चव कालच्या विषाची अजुनी तशीच आहे....
काळीज कैक वेळा विसळून पाहिले मी!
उत्तर हरेक वेळा येतेच शून्य माझे!
सुख आणि दु:ख दोन्ही मिळवून पाहिले मी!!
अक्षर अजून माझे होते तसेच आहे!
कित्ते कितीक वेळा गिरवून पाहिले मी!!
ना सोसलीच मजला, मदिरा जगा, तुझी ती!
हासू तसेच आसू मिसळून पाहिले मी!!
स्फुरते उरात ते ते, सारे कुठे उतरते?
शेरात शब्द नाना बदलून पाहिले मी!
निमिषात प्रत्ययांची चमकून वीज जाते....
चिमटीत तेज तेही पकडून पाहिले मी!
कित्येक शेर माझे अर्धेच राहिलेले....
पर्याय कैक वर्षे सुचवून पाहिले मी!
केली अनेक वेळा माझी तपासणी मी!
समजायला स्वत:ला उलटून पाहिले मी!!
हे पाश वेदनांचे सुटता मुळी सुटेना!
चाणाक्ष हिकमतीने निसटून पाहिले मी!!
माझा मलाच खांदा लागेल द्यावयाला!
माझ्या कलेवराला उचलून पाहिले मी!!
येते पुन्हा पुन्हा का उसळून नाव ओठी?
तुजला अनेक वेळा विसरून पाहिले मी!
त्या मिळकतीत माझ्या पाखड बरीच होती......
डोळे अधू तरीही, निवडून पाहिले मी!
दुसरीच सूर्यमाला, दुसराच सूर्य होता!
काही क्षणांत त्याला निरखून पाहिले मी!!
माझीच स्पंदने मज ऐकायला मिळाली!
तो एक यार होता, कवळून पाहिले मी!!
नाही नशीब माझे आले कधी उघडता!
आजन्म एकट्याने धडकून पाहिले मी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY