अजून देणे आयुष्याचे फिटले नाही!
असा सूर्य मी, ग्रहण जयाचे सुटले नाही!!
आयुष्याच्या नाटकातले मुख्य पात्र मी.....
जे केव्हाही नटले नाही....थटले नाही!
जन्मभरी आसवे जगाची वेचत होतो!
मी रडता साधे कोणी चुटपुटले नाही!!
कितीक आटापिटा जिवाचा करून झाला....
मुद्दल सोडा, तुझे व्याजही फिटले नाही!
रोजच धुळवड, रंगपंचमी दुनियेची ही......
बेरंगी दुनियेने मन बरबटले नाही!
कशी कुठे लागणार वर्णी सांगा माझी?
मला बोलवा....असे कुणाला म्हटले नाही!
कधीचाच मी हात सोडला या दुनियेचा......
म्हणून हे आयुष्य कधी फरफटले नाही!
नात्याचा पायाच मुळी प्रेमाचा होता......
ताणतणावांनीही नाते तुटले नाही!
गझल, काही शेर, रुबाया....ऐवज इतका!
घरभर फिरले चोर परंतू लुटले नाही!!
प्रथम कौतुके....नंतर हेवा....नंतर मत्सर!
गझलांचे वैभव दुनियेला पटले नाही!!
कितीक झिजलो, राबराबलो जगण्यासाठी......
जन्माचे दारिद्र्य परंतू हटले नाही!
डोळ्यांना त्या झोप अशी माहीतच नव्हती.....
जातानाही प्राण बिचारे मिटले नाही!
जीवन होते धनादेश मोठ्या रकमेचा......
हयातीमधे जे केव्हाही वटले नाही!
जन्मजात मी अधू कण्याचा असून सुद्धा.....
हे माझे आयुष्य कधी सरपटले नाही!
किती जणांना पंगतीस मी रोज घ्यायचो......
तरी कधीही घर माझे खरकटले नाही!
सुखदु:खांना दोघांनाही लांब ठेवले.....
अंगचटीला माझ्या कोणी झटले नाही!
जीर्ण जाहले, जुने जाहले.....विरले थोडे!
अजून माझे स्वप्न भरजरी विटले नाही!!
असा उंबरा, असे घर जणू मी, ज्याचे रे......
वा-यानेही दार कधी खटखटले नाही!
बावनकशी सोने होतो चोख असे मी......
वजन कधीही करा...कधी ते घटले नाही!
व्रतस्थतेने गझलसाधना चालू होती.....
कधीच मी डांगोरे त्याचे पिटले नाही!
आदर हा आतूनच येतो सहज दर्शनी......
त्याच्यासाठी मी डांगोरे पिटले नाही!
हात दिला वा-याच्या हाती मी श्रद्धेने!
म्हणून हे आयुष्य कधी भरकटले नाही!!
कानांमध्ये कधीच बोळे, अरे घातले!
म्हणून माझे कान कधीही किटले नाही!!
इतकी पापे करून वरती संत म्हणवतो....
अजूनही सर बुलंद त्याचे कटले नाही!
वठलो मी! मान्य, पण परत मी फुलेन वेड्या!
नशीब माझे इतके काही फुटले नाही!!
शपथ घातली डोळ्यांनी या ना रडण्याची.....
डोळे हे कोरडे परंतू अटले नाही!
पत्नीच्या हातात दिले मी लगाम सारे....
मला कधी ओढताच आले खटले नाही!
ज्ञानाची मी कास पकडली, झटलो शिकण्या.....
तोंडपाठ मी कधीच काही रटले नाही!
जो तो उठतो....पाजळतो....तारेच तोडतो!
भटांपुढे कोणीच कधी वटवटले नाही!!
असा घरोबा झाला त्या वादळांसवे की,
फिरून हे आयुष्य कधी विसकटले नाही!
बोलण्यामधे अशी शिताफी हासिल केली.....
कुणासवे बोलणे कधी फिसकटले नाही!
रोज स्वत:ची नेमाने करतोच सफाई!
तेवत जगलो....तरी जिणे धुरकटले नाही!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY