अजून पूर्ण मला, जाणतात लोक कुठे?
अजून थेट मला पाहतात लोक कुठे?
मनात एक, दुजे चेह-यावरी दिसते.....
घडेल भेट असे, भेटतात लोक कुठे?
कशास रक्त असे,आटवू उगा इतके?
झिजा, जळा, उसळा....मोजतात लोक कुठे?
कशास मीच घसा कोरडा करू दुनिये?
इथे तिथे बहिरे, ऐकतात लोक कुठे?
उगारुनी बघतो, हात जोडुनी बघतो!
जुमानतात कुठे? मानतात लोक कुठे?
हवा कशी पडली यावरीच वाद घडे.....
उरात जे सलते.....बोलतात लोक कुठे?
जरा कुणाविषयी, पेपरात स्फूट दिसे!
बडी करून मने, सांगतात लोक कुठे?
भलेभलेच चिखल, फेकतात मुक्तपणे......
गळे गळ्यात परत, भांडतात लोक कुठे?
किती सशक्त, सकस, वाचनीय शेर इथे......
विवाद फक्त दिसे, वाचतात लोक कुठे?
भरीव शेर किती आतुनीच तो स्फुरला......
कशास फोड करू? तोलतात लोक कुठे?
सुखे समोर उभी राहतात, कष्ट कुठे?
अतीव भोग असे, भोगतात लोक कुठे?
अजून दु:ख मला जाणवेच ओझरते....
अजून खळखळुनी, हासतात लोक कुठे?
हरेकजण दिसतो धावण्यात व्यग्र इथे!
पुकारतोस कुणा? थांबतात लोक कुठे?
-----प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY