अजूनही मंद मंद छातीत श्वास होता!
स्मशान खोळंबले, न अवधी कुणास होता!!
किती जरी चाललो, अखेरी तिथेच आलो....
कलेवरासारखाच माझा प्रवास होता!
प्रसंग बाका, परंतु सुटलो सहीसलामत....
तुझ्या कृपेचा कटाक्ष तो आसपास होता!
कुणास ठाऊक, बाग केली कुणी खरेदी?
असा कसा चेहरा फुलांचा उदास होता?
कितीक पापी नि दुष्ट दुनियेत मातलेले....
जरी कमी संत, तोच टेकू जगास होता!
बघून मृगजळ तहान मी भागवीत होतो....
प्रवासभर सोबतीस हा गोड भास होता!
निघून तो काय गेला निमूट इथुनी....
तमाम हा आसंमत झाला भकास होता!
तुझ्याच प्रेमात काय पडलो, कमाल झाली....
वसंत झाला जणू अता बारमास होता!
तुझ्यामुळे जिंदगी सुगंधीत जाहली ही....
हरेक श्वासामधे तुझा तो सुवास होता!
सुनावली शायरी अशी मैफलीस मी की,
हरेकजण हासला किती दिलखुलास होता!
जगास का वाटते करे मी भविष्यवाणी?
परिस्थिती पाहुनीच केला कयास होता!
कधीच गझलेत नाव मी गुंफले न माझे.....
कळेल माझी गझल असा बाज खास होता!
अटीतटीने झटीत होतो जगायला मी....
कळायच्या आत खेळ झाला खलास होता!
अखेर माझेच ओठ, माझेच दात होते....
मला स्वत:चाच जास्त सर्वात त्रास होता!
अनेक मतले उभे प्रतीक्षेत पूर्ण व्हाया....
तुझाच गझले, विचार चोवीस तास होता!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY