असा दु:खांत रमलो की, सुखांना पाहिले नाही!
पुन्हा नादात काट्यांच्या, फुलांना पाहिले नाही!
स्वत:चे बालपण सुद्धा पुसटसे आठवत नाही.....
कधी छोटेपणी माझ्या मुलांना पाहिले नाही!
कबूली आज मी देतो...अता साठीत जाताना...
चुका नुसत्याच मी केल्या, चुकांना पाहिले नाही!!
असे सामान्य लोकांचे असामान्यत्व जे बघती....
अशा माणूसवेड्यांना...खुळ्यांना पाहिले नाही!
जगाने पाहिले नुसते तरूचे डवरणे...वठणे!
तमाचा वेध घेणा-या मुळांना पाहिले नाही!!
मला ना दु:ख टीकेचे, परंतू खंत ही आहे....
गुणीजन भोवती होते...गुणांना पाहिले नाही!
प्रलय केदारनाथाचा...कुणा सोहेरसूतक ना!
मृतांच्या सोय-यांनीही मृतांना पाहिले नाही!!
जखम एकास होते अन् कसा दुसराच भळभळतो?
अशा बिनसोय-या केव्हा, जुळ्यांना पाहिले नाही!
जिण्याच्या आगगाडीला उगा अपघात ना झाले!
क्षणांच्या अन् कणांच्या, मी रुळांना पाहिले नाही!!
कधी शनिवार वा रविवार हेही पाहिले नाही!
कधी मी नोकरीमध्ये सुट्यांना पाहिले नाही!!
जिण्याच्या या तरंगांची मजा मी काय वर्णावी!
खरोखर आजवर ऐशा झुल्यांना पाहिले नाही!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY