बघ काय हाल आहे, माझे हवाल आहे!
मस्तीत माझिया मी, अगदी खुशाल आहे!!
पुस्तक खुलेच असते माझे तिन्हीत्रिकाळी...
वाचा कुणी कधीही, जाहीर हाल आहे!
करणार काय माझा ते न्याय अन् निवाडा?
हातामधेच माझ्या माझा निकाल आहे!
ही एकमेव आहे उरली तिची निशाणी......
डोळे पुसायाला जो घेतो रुमाल आहे!
वाडे जुने न उरले, गृहसंकुलेच झाली!
पाडून दात बनल्या कवळ्या, कमाल आहे!!
हृदयात मात्र त्याच्या करुणा, दया, जिव्हाळा!
बोलायला परी तो अगदी जहाल आहे!!
ऐका सुशिक्षितांच्या नामी शिव्या सुसंस्कृत....
मन उच्चशिक्षितांचे भारी बकाल आहे!
विकतात ते बिलोरी स्वप्ने जगास आता!
घे स्वप्न कोणतेही, त्याचा दलाल आहे!!
ते केवढा मिरवती, बघ, आजकाल टेंभा.....
हातात ऐन दिवसा सुद्धा मशाल आहे!
माझ्या पराजयाची सुद्धा वरात निघते!
कोठे अबीर आहे, कोठे गुलाल आहे!!
त्या रेशमी स्मृतींना अद्याप ऊब आहे!
अजुनी तुझ्या स्मृतींची उबदार शाल आहे!!
बघुनी मलाच जो तो, का बुचकळ्यात पडतो?
मी काय, सांग, इतका अवघड सवाल आहे?
ही एकदाच भरुनी मिळते जगात येता!
नाही हयात, ही तर, दुर्मिळ पखाल आहे!!
झरणार का न सांगा लयबद्ध रोज गझला?
आता अनाहताचा जगण्यात ताल आहे!
दरसाल हेच होते....गरिबी तशीच आहे!
यंदा म्हणे निराळे येणार साल आहे!!
जपले जरी कितीही, का मोडतोच पापड?
मजला बघून कोणी फुगवीत गाल आहे!
माझ्याच वाटणीला येते तिरीप कैसी?
माथ्यावरी तरूची छाया विशाल आहे!
आले फळास माझे जे पुण्य मी कमवले!
मी ज्ञानिया, तुक्याच्या घरचा हमाल आहे!!
विधिलेख काय आहे, मजला न ज्ञात काही!
इतकेच ज्ञात आहे...विस्तीर्ण भाल आहे!!
पिनकोडही चुकीचा, तिकिटे अपूर्ण ज्यावर;
मी एक तातडीचे उघडे टपाल आहे!
कर तू लिलाव....माझी इतकीच मालमत्ता!
गझला, कता, रुबाया इतकाच माल आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY