बावनकशी माझी गझल तोलायला साधन हवे!
त्यांच्याकडे नव्हतेच माझ्याजोगते रे, ताजवे!!
मज वाट दाखवतात दु:खे आणि माझ्या वेदना....
सांगा कशाला मी करावी त्या सुखांची आर्जवे?
एकेक माझा शेर म्हणजे हार मोत्यांचा जणू....
गझलेत माझ्या मी जगाची माळली ती आसवे!
घालून सौख्याचाच सदरा, दु:ख आले ते जुने....
मज वाटले की, आज भेटायास आले सुख नवे!
ही केवढी आहे हुशारी रे, मनाची माझिया....
साठीतही मज स्पष्ट सारी जिंदगानी आठवे!
हातात रस्त्याच्याच मी आहे दिलेला हात हा....
रस्ताच उरला सोबती जो चालतो माझ्यासवे!
ओढीत हे वार्धक्य माझे सांग धावावे किती?
तू धाव मृत्यू, आज माझ्याने न साधे चालवे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY