Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

बिळातले उंदीर निघाले........

 

(कविता)
वृत्त: समजाती-अष्टावर्तनी-वनहरिणी-मात्रावृत
***************************************************

 

 


बिळातले उंदीर निघाले, शिकारींस ढाण्या वाघांच्या......
फडताळांची झुरळे सुद्धा पडली मागे मागे त्यांच्या!

 

एक काफिला तो भ्याडांचा खुराड्यामधे चिवचिव करतो!
कुणी खास तोतया त्यांस मग, अनाहूत सल्लेही देतो!!

 

दूर, दूरवर ज्यांचे काही सोयर नाही कवितेशी ते......
पांघरून भरजरी झूल, बसलेले दिसले झिपरे मज ते!

 

जन्मजात ते भाटच होते, काय अपेक्षा त्यांच्याकडुनी?
हातामध्ये घेत तुणतुणे वळवळती ते अधुनी मधुनी!

 

कुटाळक्या करतात, बिळातच खुडबुड करती शानदार ते!
असे वाटते त्यांना की, गर्जनाच करती धारदार ते!!

 

पुकारती दुस-या भ्याडांना, तेही जमती हळूहळू मग!
एक कळप भ्याडांचा जमतो, टाळ्या पिटतो, घाबरून मग!

 

मखरांमधली मानाची मग काही नावे दिसू लागली.....
प्रशस्तीपत्रक वाटायाला हळूच तीही पुढे जाहली!

 

एक खुजा जन्माचा, करतो पुरस्कार जाहीर खुजांचा!
निवडसमीती ठरते घ्याया शोध अशा त्या मानक-यांचा!!

 

संपायाची भीती ज्यांना तेच लढे उरण्याचे करती!
गझल एकही खणखणीत ना कोणाच्याही नावावरती!!

 

अशा घोषणा, अशी बुराई, करून का मोठेपण येते?
गनिमी काव्याने का कोणा सरस्वती रे प्रसन्न होते?

 

डोळ्यांना लावून झापडे, झोपेचे ते सोंग वठवती!
कशास डोकेफोड करावी, उठवायाला सोंगांना मी?

 

चला येथुनी निघून जाऊ, कळपांना का, कुणी विचारे?
रक्त आटवू कशास माझे, अशामुळे का कुणी सुधारे?

 

 

 

-------प्रा. सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ