Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

चांगली कळते मला त्यांची अरे, वाखाणणी!

 

चांगली कळते मला त्यांची अरे, वाखाणणी!
पाठ फिरली की, सुरू करतात ते हेटाळणी!!

 

 

चेह-यांना माणसे समजायचो वेड्यापरी....
आतल्या गाठी कळाया मी न होतो धोरणी!

 

 

खूप झाले युद्ध माझ्याशीच माझे आजवर...
आज केली मीच माझ्याशी तहाची बोलणी!

 

 

मी बहर उधळीत गेलो चौकडे कैफामधे....
पाहिले नाही, कुणाची काय होती मागणी!

 

 

मी जगाचे दु:ख गझलेतून सारे मांडले....
वेदनांची पण स्वत:च्या विसरलो मी मांडणी!

 

 

पुण्य या हातून झाले, मी न केव्हा मोजले....
ना दवंडी मी दिली, केली न कोठे नोंदणी!

 

 

मी उद्या नसलो तरी दिसतील हे माझे मळे....
जायची वाया न गझलांची कधीही पेरणी!

 

 

सर्व दुख-या वेदना अन् सौख्य केले वेगळे....
ही अशी केली अखेरी मी मनाची फाळणी!

 

 

मी न रडलो यामधे कर्तुत्व माझे कोणते?
आसवांना शिस्त माझ्या लावते ही पापणी!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ