चार पैशांनी कधी मातू नये!
आणि गरिबीने कधी लाजू नये!!
बोल पण, मुद्दयास धरुनी बोल तू....
फार पाल्हाळीक रे, बोलू नये!
सोडुनी काळावरी तू बघ तरी....
वाट इतका वेळही पाहू नये!
का असा विश्वास गमवावा कुणी?
गुपित कोणाचे कुणा सांगू नये!
काम पत्नीला करू द्यावे तिचे....
सारखे कामात डोकावू नये!
दु:ख कोणाचे असो, ते दु:ख रे....
घर सुखाचे त्यावरी बांधू नये!
भूतकाळातच किती रेंगाळतो.....
काळजाला एवढे खोदू नये!
फार डोक्यावर कुणा बसवू नये....
दिल कुणाचेही कधी तोडू नये!
एवढी धरसोडही नाही बरी....
काम अर्ध्यावर कधी सोडू नये!
वाग तू मर्जी जशी आहे तुझी...
मात्र मर्यादा कधी लंघू नये!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY