Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

चुकाच केल्या चुकातुनी ना शिकलो केव्हा!

 

चुकाच केल्या चुकातुनी ना शिकलो केव्हा!
डोळे असुनी डोळस नाही जगलो केव्हा!!

 

विवंचनांचा इतका पगडा होता मजवर.....
अता उमजते खळखळून ना हसलो केव्हा!

 

उपेक्षाच गझलांची माझ्या असे अपेक्षित....
मी कोणाच्या दारोदारी फिरलो केव्हा?

 

असे नव्हे मी सुखीच आहे जीवनात या....
सांग सुखा पण तुजसाठी मी झुरलो केव्हा?

 

किती भरडलो, किती बदललो ना ना म्हणता.....
जीवना तुझ्या जात्यातच घरघरलो केव्हा?

 

वळून मी बघतो गेलेल्या आयुष्याला.....
कधी नेमका हसलो होतो, रडलो केव्हा?

 

आज तुझ्या ओठांवर आल्या गझला माझ्या.....
केव्हा तू गातेस मला मी सुचलो केव्हा?

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ