Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

दिसतात सरळमार्गी पण, वाकड्याच चाली!

 

दिसतात सरळमार्गी पण, वाकड्याच चाली!
निष्पाप चेह-यांचे आहेत ते मवाली!!

 

 

चुकुनी गळून पडले त्यांचे मधे मुखोटे....
त्यांची कितीक त्रेधा तिरपीट मग उडाली!

 

 

म्हणुनीच बोलतो तो तुसड्यासमान आता....
त्याची अरे, पिण्याची बहुतेक वेळ झाली!

 

 

हरएक वाट अडते अडवून चक्क बसले....
ये-जा करायचीही घेतात ते दलाली!

 

 

दुरुनीच पाहतो मी, दुरुनीच बोलतो मी....
मी पाहिल्यात सा-या जवळून हालचाली!

 

 

आता न राहिलेला शेजार कोणताही....
उरल्यात वळचणीला नुसत्याच फक्त पाली!

 

 

दुनिये, तुझाच गाडा आजन्म ओढला मी....
मी एक ब्रह्मचारी, घेतो न जो हमाली!

 

 

गझलेस ते मुकर्रर ऐसे करीत होते....
वाटेल की, कुणाला ती लावणी, कवाली!

 

 

उबदार अन् गुलाबी गेले दिवस निघोनी....
घडिबंद आठवांच्या उरल्यात फक्त शाली!

 

 

लाडात काय आली, काळीज दे म्हणाली.....
मी जिंदगीच माझी केली तिच्या हवाली!

 

 

बुडत्यांस हात त्यांनी देऊन तारले पण....
जी वाचवीत होती, ती माणसे बुडाली!

 

 

कित्येक शिष्य माझे जगभर प्रसिद्ध झाले.....
गुरुदक्षिणाच मजला माझी जणू मिळाली!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ