Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

डोळ्यांधील पाणी वाचा तुम्ही मुलांनो!

 

डोळ्यांधील पाणी वाचा तुम्ही मुलांनो!
काळीज या तरूचे जाणा तुम्ही फुलांनो!! //ध्रृ//

 

शाळा नव्हे, असे हे घरटेच एक तुमचे....
मैदान हे न नुसते, आंगण जणू घराचे!
एकेक वीट इथली तुमचीच पाखरांनो!! //१//

 

प्रत्येक वर्ग इथला जपतो जुन्या स्मृतींना!
आवाज ऐकुनीही तो ओळखे मुलांना!
देईल हाक तुम्हा ही माय वासरांनो!! //२//

 

येथील ऊब केव्हा विसरू नका मुलांनो!
येथेच पंख बनले बलवान, पाखरांनो!
आकाश साद देते तुम्हास लेकरांनो!! //३//

 

रस्ता सरळ न असतो कुठलाच जीवनी या!
असतील खाचखळगे, वळणे पथामधे या!
देईल हात शिकवण तुम्हास पोरट्यांनो!! //४//

 

पाया भरून झाला तुमच्या अता यशाचा!
रस्ता खुलाच केला तुमच्या पराक्रमाचा!
उत्तुंग शिखर तुम्ही गाठाच बालकांनो!! //५//

 

माणूसकी कधीही विसरू नका मुलांनो!
शाळेस आपल्या या विसरू नका मुलांनो!
देताच साद शाळा, या धावुनी मुलांनो!! //६//


डोळ्यांमधील पाणी वाचा तुम्ही मुलांनो!
काळीज या तरूचे जाणा तुम्ही फुलांनो!

 

 

 

------प्रा.सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ