दु:खांनी अन् घावांनी मज असे नितळले होते!
दागिन्याप्रमाणे माझे आयुष्य घडवले होते!!
एकेक वार होताना काळीज हदरले माझे...
मी रडू दिले ना मजला पण, मला रडवले होते!
मी घडीव झालो होतो, आभारी मी रस्त्यांचा....
मज याच बिकट रस्त्यांनी हे असे वळवले होते!
प्रत्येक शब्द सोन्याचा, ना उगाच झाला माझा....
एकेका शब्दासाठी काळीज कढवले होते!
एकेक ओळ गझलेची व्यामिश्र केवढी झाली....
मी ओळीओळीमध्ये दिव्यत्व मिसळले होते!
आयुष्य खर्च हे झाले, कृतकृत्य जाहलो पण मी....
मुर्दाड गाव हे होते पण, त्यास उठवले होते!
गझलेच्या केव्हा पडलो प्रेमात कळाले नाही.....
पण, गझलेसाठी अवघे आयुष्य उधळले होते!
भोव-यांस अन् लाटांना मी कधी बोललो नाही.....
मज साळसूद काठांनी कैकदा बुडवले होते!
सोनेरी पंखांचा या उपयोग जाहला नाही.....
पांगळ्याच पायांनी या मज खरे उभवले होते!
ते फुलणे तारुण्याचे अद्याप उसळते हृदयी....
सुरकुत्यांमुळे मुखड्याचे तारुण्य निसरले होते!
सरलेल्या श्वासांचा मी आताशा ताळा घेतो....
एकेक करत मी सारे आयुष्य उसवले होते!
वादळे व्यथांची अन् ती चिंतांची सरली सारी....
आयुष्यच सारे तुझिया हातात निरवले होते!
ते घाव तुझे मी जपले, काळजामधे कायमचे.....
दागिन्यांप्रमाणे मी ते आजन्म मिरवले होते!
तारांगण सारे दिसते बघ, सुने सुने झालेले....
कोणते कळेना तारे चुपचाप निखळले होते!
गेलेल्या आयुष्याने मज पाखडले इतके की,
देवाने साधन म्हणुनी मजलाच निवडले होते!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY