एक मी तलवार आहे, हे कुणाला ज्ञान नाही!
आजतागायत कुणाची कापली मी मान नाही!!
मी बरा अन् शायरी माझी बरे दोघेच आम्ही....
घेतला कोणाकडोनी विकत मी सन्मान नाही!
मित्र जे मज चार होते, तेच माझे यार होते!
आमच्यामधला कुणीही जाहला बेमान नाही!!
बोल तू बोलायचे ते, तो तुझा अधिकार आहे....
बोलणे कळते मला, मी एवढा नादान नाही!
लीनता पिंडात माझ्या, पायही जमिनीवरी हे....
जाहले मजला कधीही ठेंगणे अस्मान नाही!
पाहिली त्यांची अमीरी आणि दानतही बघितली....
फायद्या खेरीज कोठेही दिलेले दान नाही!
लांबचा असला तरीही सरळ रस्ता चालतो मी.....
आडवाटांशी कधीही बांधले संधान नाही!
तो बिचारा गात आहे, लागली त्याची समाधी.....
केवढे स्वर्गीय गाणे, ऐकणारा कान नाही!
वळचणीला या तुझ्या राहीन आनंदामधे मी.....
राहण्याजोगे मला अन्यत्र कोठे स्थान नाही!
पोचल्या निम्म्याहुनी जास्तीच गव-या रे, स्मशानी.....
आणि मी अद्याप माझे बांधले सामान नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY