एक मुलखावेगळा मी सूर आहे!
मी बड्या धेंडांस नामंजूर आहे!!
मस्करी, टीका, टवाळी, दांडगाई....
आज त्यांच्यापासुनी मी दूर आहे!
शेर माझा तळपतो सूर्याप्रमाणे!
अंतरी माझ्या तसे काहूर आहे!!
सरबराईला सुखाच्या वेळ कोठे?
माझिया दु:खांमधे मी चूर आहे!
पाहिली ना आग हृदयातील कोणी!
या जगाने पाहिला तो धूर आहे!!
पाहण्यासाठी मला पडतो गराडा....
मी अवेळी लोटलेला पूर आहे!
मी कुणाची का बरे आर्ती करावी?
पेटलेला मी तुझा कापूर आहे!
श्वापदेही माणसाळू लागलेली....
माणसांचे वागणे पण, क्रूर आहे!
खेळ खेळाया शिकारीचा असा हा;
मी तुझ्याइतका कुठे रे शूर आहे?
त्यामुळे पान्हावतो गझलेमधे मी!
वेदनांनी दाटले हे ऊर आहे!!
सांडले तारुण्य जे हातून माझ्या....
आज वार्धक्यातही हुरहूर आहे!
या पिढीला द्यायला या कनवटीला....
शायरीची संपदा भरपूर आहे!
आमच्या लग्नास झाली तीस वर्षे!
आजही मन भेटण्या आतूर आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY