एक नैवेद्य समजून देतो!
तोंडचा घास काढून देतो!!
भाकरी एक अन् कैक भूके.....
तीच सगळ्यांत वाटून देतो!
एक चतकोर जी काय मिळते.....
भाकरी ती विभागून देतो!
सांत्वने दु:खितांची कराया.....
चित्र स्वप्नील काढून देतो!
का न पोचायचे भाव माझे?
भेट हृदयात भिजवून देतो!
विस्कटू दे भले वादळांना......
मी घडी तीच बसवून देतो!
आज मतदार जागाच झाला!
योग्य लोकांस निवडून देतो!!
शिष्य बावनकशी लाभला की,
दागिना एक घडवून देतो!
विषय आशय असू दे कितीही.....
मोजमापात बेतून देतो!
एकदा आपले मानले की,
चक्क काळीज तोडून देतो!
प्राण गझलेमधे ओततो तो!
चाल स्वर्गीय लावून देतो!!
परिस तो एक साक्षात आहे!
लोह कनकात बदलून देतो!!
दे मला चित्त तू चोरलेले.....
दावणीलाच बांधून देतो!
लाव नंतर नभाला ठिगळ तू.....
मी तुला आज टाचून देतो!
ही नजर आजही सूक्ष्म आहे!
दे सुई, आण ओवून देतो!!
------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY