ऐक राघूच्या दिलाचे बोल मैना!
अन् तसा वाजव तुझाही ढोल मैना!!
पाहता तुजला घसरतो पाय माझा....
तूच हा सांभाळ माझा तोल, मैना!
रंग जर नाही तुझा येथे मिसळला......
तर मला वाटेल होळी...फोल, मैना!
एक तू, बाजूस दुस-या विश्व सारे......
मोल ते आहे तुझे अनमोल, मैना!
हा उभा आहे तुझ्या टेकूमुळे मी......
तू नको खोलूस माझे पोल, मैना!
झाकलेली मूठ ती, आहे तुझी मी.......
फक्त एकांतामधे ती, खोल मैना!
केवढी घेशील राघूची परीक्षा?
सोड आता मौन, अन् तू बोल मैना!
काय या दुनियेस किंमत, तू वगळता.....
विश्व ते वाटेल मातीमोल, मैना!
शिंपल्यामधला तुझ्या मी एक मोती!
मी तुझ्यावाचून, कवडीमोल, मैना!!
माझियापाशीच तू येशील अंती......
ऐक, ही दुनिया तशीही गोल, मैना!
मी कुठे प्रत्येक वेळी हात द्याया?
तू तुझा सांभाळ वेडे झोल, मैना!
मी कुठे खंदस्त अन् खमक्या पुरेसा?
तू नको घालूस इतका झोल, मैना!!
संपले अश्रूच, सुकली लोचने ही......
काळजाची जाण माझ्या ओल, मैना!
घेच सांभाळून राघूला जरासे.......
जन्मत: हृदयात त्याच्या होल, मैना!
तू नको पाहूस इतके मदिर मजला.....
हे पहा, जातोच माझा तोल, मैना!
फक्त डोळ्यांनीच काही बोल, मैना!
गीत मी गातो हवे तर, डोल मैना!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY