गगनातुनी मनाच्या निखळून कोण गेले?
पळभर मनास माझ्या उजळून कोण गेले?
इतका कसा अचानक गंधाळलो असा मी?
मज समजलेच नाही, जवळून कोण गेले!
मन सैरभैर झाले हे कोणत्या स्मृतींनी?
वा-यासमान मजला उधळून कोण गेले?
एकांत फक्त होता तो सोबतीस माझ्या.....
मज वाटते असे का? कवळून कोण गेले!
आली कुठून इतकी गझलेमधे झळाळी?
एकेक शब्द माझा विसळून कोण गेले?
प्रत्येक ओळ झाली दिपवून टाकणारी.....
ही वीज जाणिवांची मिसळून कोण गेले
ते एकजात सारे चवताळले कशाने?
बघतो निमूट मीही खवळून कोण गेले!
भरती न ओहटी अन् मन शांत शांत झाले....
इतक्यात कोण जाणे उसळून कोण गेले?
तळ लागला दिसाया सुस्पष्ट आरशासम.....
घायाळ काळजाला नितळून कोण गेले?
सारे विचार माझे का पांगले अचानक?
एकेक शल्य माझे वगळून कोण गेले?
दुनियेभरील दु:खे का लेखणीत जमली?
हृदयामधे अचानक वितळून कोण गेले?
मी पाहिलेच नाही शेताकडे मनाच्या....
निमिषात शेत माझे गदळून कोण गेले?
अधरांवरी अचानक मतला कुठून आला?
आयुष्य पूर्ण माझे ढवळून कोण गेले?
इतका प्रकाशलो की, मी काजळून गेलो
मज आरशाप्रमाणे निवळून कोण गेले?
मी जिंदगी न पुरती गुंडाळलीच अजुनी.....
इतक्यात वळकटी ही अवळून कोण गेले?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY