हा न माझा पिंड वेड्या, भाट मी होणार नाही!
स्वागतासाठी कुणाच्या, थाट मी होणार नाही!!
बासरी आहे सुरीली एक मी परमेश्वराची......
सूर अंगागामधे, गोंगाट मी होणार नाही!
रसिकहृदयातील सिंहासन जरी काबीज केले.......
जाणते माझी गझल.......सम्राट मी होणार नाही!
कैकदा फेसाळलो मी.....कैकदा झेपावलो मी.......
लक्ष जोवर ना तटाचे, लाट मी होणार नाही!
अर्धपोटी, अर्धमेले, अन् भुकेले चौकडे हे......
पोट भरलेल्या जिवांचे ताट मी होणार नाही!
उच शिखरांना विसर का पायथ्याचा या पडावा?
शिखर कुठलेही असो, पण घाट मी होणार नाही!
चार किरणेही कृपेची अंतरी पोचू नये या......
एवढा हृदयातुनी घनदाट मी होणार नाही
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY