हात जेव्हा टेकले.....
हात गेले जोडले!
काय मी सांगू कुणी?
हृदय माझे तोडले!
वेचल्या ठिक-याच अन्.....
स्वप्न माझे जोडले!
मी तुझ्या शब्दावरी.....
पाश सारे तोडले!
बाटलेले आरसे......
शेवटी मी फोडले!
मी पतंगासारखा!
मज हवेने तोलले!!
का मला तू शोधशी?
तूच मजला खोडले!
सोड आता मौन तू.....
प्रेत सुद्धा बोलले!
कैकदा संकल्प मी....
सोडले अन् मोडले!
हात दे आता तरी.....
मी जगाला सोडले!
टाळले मी टाचणे.....
भाग्य जेव्हा फाटले!
जाणतो दुनिये तुला.....
कैकदा तुज ताडले!
लाट मी आहे तटा!
तू मला फेटाळले!!
यात्रिकांना ज्ञात ना......
काय पुढती वाढले?
मन तुझ्यामध्ये कधी.....
समजले ना गुंतले!
दार वारा वाजवी......
तूच आली वाटले!
जिंदगीवर भाळलो!
वेड जीवा लागले!!
पुण्य कमवू लागलो.......
पाप जेव्हा टाळले!
मुखवट्यांच्या आतले.......
चेहरे मी वाचले!
वळचणीपाशी सुखे.......
मीच त्यांना टाळले!
ना कुणाच्या भोवती......
पाय हे घोटाळले!
ना फुले, ना चांदणे......
फक्त मजला माळले!
अडचणीला माझिया......
कोण सांगा धावले?
याद आली....ती नव्हे!
लाभले जे धाडले!!
घात करती ओठ हे!
गूज शतदा घोकले!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY