हवा ही पावसाळी पण, सरींची खातरी नाही!
तहानेला नसे पाणी, भुकेला भाकरी नाही!!
तुला जे वाटते आहे, मनाचे खेळ ते अवघे....
तुझी चिंता अनाठायी, तुझी भीती खरी नाही!
घराला दार ना खिडक्या, नसे छप्पर पुरे वरती.....
न वळचणही अडोशाला, पडाया ओसरी नाही!
कितीदा चालुनी आली स्वत: संधीच सोनेरी.....
तिनेही पाहिले दरवेळा करंटा मी घरी नाही!
मनापासून मी अध्यापनाचे व्रत कडक केले....
कधीही नोकरीला मी म्हणालो नोकरी नाही!
दिला जो शब्द माझ्या जिंदगीला तो खरा केला.....
कधी मी हुंदका येऊ दिला ओठांवरी नाही!
मनाने खूप उत्साही, उसळते रक्तही अजुनी....
परी तब्येत कायेची अता तितकी बरी नाही!
अताशा एकटेपण खायला उठते दुपारीही....
अता ओठांवरी या येतही आसावरी नाही!
मराठी गझलही जाते सरळ हृदयात रसिकांच्या.....
तसूभरही कमी माझी मराठी वैखरी नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY